Wednesday, August 11, 2021

पूज्य वी डी नागपाल जी - भावपूर्ण श्रद्धांजली आणि संस्मरण

श्रीमद्भगवद्‌गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात -
" जातस्य हि धृवो मृत्यु "
अर्थात - जे जन्माला आले आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे.
हा प्रकृतीचा नियम आहे. जो कोणी संसारात येतो तो एक दिवस संसार सोडून निघून जातो.
पण काही लोक असे असतात, जे आपल्या मनावर कायमस्वरूपी प्रभाव पाडून जातात, इतक्या सुंदर आठवणी मागे सोडून जातात की ज्यांपासून आपण नेहमी प्रेरणा घेऊ शकतो.

असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते - आदरणीय श्री वी. डी. नागपाल जी होते, ज्यांनी युवावस्थेत माझ्या विचारांना योग्य दिशा देण्यात आणि माझा विश्वास पक्का करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१९६९ मध्ये जेव्हा मी सरकारी महिला कॉलेज, पटियाला येथे कनिष्ठ व्याख्याता (junior lecturer) म्हणून कार्यरत झालो, तेव्हा पूज्य नागपाल जी पंजाबच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये जे. ई. - या पदावर कार्यरत होते. त्याचदरम्यान संत निरंकारी सत्संग भवन, पटियाला येथे पहिल्यांदा माझी आणि त्यांची भेट झाली.

पिता जी (संत अमर सिंह जी) नागपाल जींच्या अत्यंत जवळचे होते आणि त्यांचे खूप कौतुक करायचे व त्यांना मान द्यायचे.
शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांमध्ये मला पिता जींसोबत त्यांच्या प्रचार यात्रांना जाण्याचे सौभाग्य प्राप्त होऊ लागले. विसाखी राम पागल जी (अमर जी), सुशील कुमार सेवक जी आणि भगिनी आशा जी तर नेहमीच सोबत असत आणि वेळेनुसार पूज्य नागपाल जीही अनेक प्रचार यात्रांमध्ये सोबत असत. एका सत्संग कार्यक्रमाच्या स्थानावरून दुसऱ्या सत्संग स्थळावर पोहोचेपर्यंत, स्टेशन वॅगनमधून प्रवास करताना सहज बोलता-बोलता पिता जी आम्हाला अनेक गोष्टी समजावत असत आणि नेहमी आम्हाला गहन आध्यात्मिक शिकवण देत असत.

सत्संगानंतर किंवा जेव्हाही आम्हाला मोकळा वेळ मिळत असे, आम्ही त्यांनी उल्लेखलेल्या गोष्टींवर चर्चा करत असू, आपले विचार आणि अनुभवही एकमेकांना सांगत असू. हळू हळू मला नागपाल जींशी खूप आपलेपणा वाटू लागला. आमच्यात वयाचे मोठे अंतर असूनही, ते माझ्यापेक्षा खूप मोठे होते, तरीही, आमच्यात मैत्रीचे संबंध जोडले गेले - आम्ही चांगले मित्र बनलो पण तरीही माझ्या मनात नेहमी त्यांच्याप्रति आदर व सन्मान असे. मी एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांचा सन्मान करायचो आणि त्यांनी नेहमी मला लहान भावाप्रमाणे प्रेम दिले आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझे मार्गदर्शन केले.

अनेकदा असे होते की एखादी छोटीशी घटना आपल्या जीवनात अत्यंत प्रभावी ठरते. अशीच एक अविस्मरणीय घटना त्या काळात माझ्यासोबत घडली. त्या घटनेने माझा विश्वासही दृढ केला आणि माझे विचारही कायमसाठी बदलून टाकले. मी या घटनेचा उल्लेख अनेकदा व्यक्तिगत रूपात किंवा सामूहिक रूपात संवाद साधताना आणि सत्संगातही केला आहे.

एकदा पिता जी मला छोट्याशा गोष्टवरून सर्वांसमोर ओरडले आणि रागात बरंच काही बोलले. मला वाईट वाटले, अपमानित झाल्यासारखे वाटले.

मी रोज सकाळ-संध्याकाळ सत्संगाला जात राहिलो पण सत्संग संपल्यावर लगेच तिथून निघून यायचो आणि सत्संगाची वेळ वगळता इतर वेळी मी भवनवर जाणे बंद केले. जेव्हाही पिताजींनी मला त्यांच्यासोबत प्रचार यात्रेला यायला सांगितले, तेव्हा मी अत्यंत व्यग्र असण्याचे कारण देऊन नकार दिला. त्यांच्या हे लक्षात आले आणि एका सायंकाळी नागपाल जी जेव्हा भवनवर आले तेव्हा पिता जी त्यांना म्हणाले, 'मला वाटते राजन माझ्यावर नाराज आहे. तो तुमचा सन्मान करतो आणि मोठ्या भावासमान मानतो, त्यामुळे तुम्ही त्याच्याशी बोला."

नागपाल जी माझ्या खोलीवर आले - तेव्हा मी देसी मेहमानदारीमध्ये डॉ. दिलीप सिंह जींच्या घरी भाड्याने घेतलेल्या एका खोलीत रहायचो. आमच्यात मैत्रीचे संबंध असल्याने मी नागपाल जींशी मनमोकळेपणाने बोललो आणि सांगितले की पिताजी असे म्हणाले, पिताजी तसे म्हणाले, त्यांनी तसे करायला नको होते...
माझे बोलणे मध्येच तोडत ते म्हणाले, जर तुम्ही असे म्हणाल की अमर सिंह जी असे म्हणाले आणि तसे म्हणाले, तर ठीक आहे. पण एका बाजूला तुम्ही त्यांना पिता जी म्हणत आहात आणि अशी तक्रारही करत आहात?
पुढे त्यांनी म्हटले - आपल्या वडिलांशीवाय इतर कोणालाही पिता जी म्हणण्याचा अर्थ हा की, तुम्ही त्या व्यक्तीचा सर्वोच्च सन्मान करत आहात. एकतर त्यांना पिता म्हणू नका आणि जर वडील मानत असाल तर जरा विचार करा - वडिलांनी ओरडल्यावर आपण वडिलांना सोडून देतो का?
त्यामुळे, मित्रा, एकतर त्यांना भाई अमर सिंह जी नावाने संबोधित करा, पिता जी नव्हे. आणि जर वास्तविकतेत तुम्ही त्यांचा पित्याच्या रूपात सन्मान करत असाल, तर ते आपल्या कर्मांतून प्रकट करा कारण किंमत शब्दांची नाही, तर कर्माची असते.

हे ऐकून मी निःशब्द झालो आणि पिताजींचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्यासोबत भवनमध्ये गेले.

ही माझ्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना होती जिने एका छोट्याशा गोष्टीसाठी, एक महान संत भाईसाहब अमर सिंह जींपासून दूर जाण्यापासून वाचवले - एक असे संत ज्यांचे भेटणे कोणाच्याही जीवनात सौभाग्यची गोष्ट असते.
---------------------------------------------------------------------

नागपाल जी पटियालापासून १०-१२ किलोमीटर दूर, नंद पूर केशो या छोट्याशा गावात कुटुंबासोबत राहत होते. मी कधीकधी त्यांना भेटायला तिथे जायचो. त्यांच्या पत्नीला मी मोठी बहीण मानायचो आणि त्या मला राखी बांधायच्या. नंद पूर केशो येथे नागपाल जींच्या वडिलांचीही भेट झाली. एकदा त्यांनी मला सांगितले की, विशन लहानपणापासूनच विनम्र आणि संत स्वभावाचे व्यक्ती होते. मी विचारले, "विशन कोण ?" त्यावर ते हसले. जोवर त्यांच्या वडिलांनी मला सांगितले नव्हते तोवर मला हे माहीत नव्हते की त्यांचे नाव विशन दास होते, कारण आम्ही सगळे नेहमी त्यांना फक्त नागपाल जी याच नावाने ओळखायचो.
     --------------------------------------------------------------

१९७१ मध्ये मी बाबा गुरबचन सिंहजींचा आदेश मानून पटियालाच्या महाविद्यालयातील नोकरी सोडून जम्मूला गेलो. इथे नागपाल जींची बदली मुक्तसर येथे झाली, तेव्हा बाबा गुरबचन सिंह जींनी त्यांना नवनिर्मित भवनमध्ये राहण्यास सांगितले. त्यांनी गुरुची आज्ञा तर मानली पण जोपर्यंत भवनमध्ये राहिले तोपर्यंत ते मासिक भाडे द्यायचे. त्यांचे म्हणणे होते की जर इतर कोणत्याही ठिकाणी भाड्याने राहिलो असतो तर त्याचे भाडे भरावे लागले असते.
त्यांनी भवनमध्ये स्वतःच्या निवासस्थानाच्या विजेच्या तारा उर्वरित भवनच्या विजेच्या तारांपासून वेगळ्या केल्या आणि स्वतःच्या निवासस्थानाचे बिल स्वतःच भरायचे !

पंजाब प्रचार यात्रेदरम्यान मला नेहमी मुक्तसर जाण्याचा आणि नागपालजींच्या चारणांशी राहण्याची संधी मिळायची. त्या वेळी महात्मा सुरजीत सिंह जी विरक देखील मुक्तसरमध्येच रहायचे त्यामुळे तिथे त्यांचेही सान्निध्य मिळायचे.
एकदा बोलता बोलता भवनमध्ये राहण्याचे भाडे देण्यासाठी आणि विजेचे बिल इत्यादी देण्यासाठी मी नागपालजींचे कौतुक केले, तर ते म्हणाले की यात मोठे काही नाही - मी केवळ पिता जींच्या शिकवणुकीचे पालन करत आहे.

संत अमर सिंहजींनी आम्हाला दृढ विश्वासासोबतच प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठता आणि सिद्धांतांचे दृढतेने आणि कर्मठपणे पालन करण्याची अमूल्य शिकवण नेहमी दिली आणि पूज्य नागपाल जींनी त्या शिकवणीला व्यावहारिकतेत उतरवले व आपल्या जीवनाचे अभिन्न अंग बनवले.

हृदयात सद्गुरुप्रति श्रद्धा आणि सर्वशक्तिमान निरंकारावर विश्वास असणारे असे ते एक महान संत व कुशल प्रबंधकही होते. आपली अधिकृत कार्ये पार पाडण्यात ते कुशल होतेच त्यासोबत विनम्र आणि हृदय शुद्ध असणारे संतही होते. एक कौशल्यपूर्ण प्रशासक (administrator) आणि उच्च पदाधिकारी असूनही त्यांची आध्यात्मिक बाजू आणि संतमती नेहमी प्रबळ राहिली, जी त्यांच्या प्रमाणिकतेतून आणि विनम्रतेतून स्पष्टपणे दिसून येत असे.

त्यांची कमतरता तर भासेलच, पण त्यांच्या गोष्टी आणि त्यांचे गुण - त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सालस, विनम्र व व्यावहारिक जीवनाच्या माध्यमातून सदोदित आपल्या स्मरणात राहतील.
                                ' राजन सचदेव '
                 (मराठी अनुवाद:  प्रज्ञा सावंत जी - मुंबई)


मुक्तसर 1981

3 comments:

ये दुनिया - Ye Duniya - This world

कहने को तो ये दुनिया अपनों का मेला है पर ध्यान से देखोगे तो हर कोई अकेला है      ~~~~~~~~~~~~~~~~~~ Kehnay ko to ye duniya apnon ka mela hai...